Wednesday, February 21, 2007

मखमली पंखावर...


(सोहिनी वंजारी)
अरुणाचलने आपल्या कुशीत खूप काही दडवून ठेवलंय. दिवस सोनेरी कसे असू शकतील, असा प्रश्‍न मला आधी पडायचा. पण मला पडलेलं हे कोडं त्या दहा दिवसांनी अलगद सोडवलं! तिथं पाहिलेल्या फुलपाखरांच्या जातींचा आकडा सांगायचा झाला, तर तो १२२ असा रुक्षपणे सांगता येईल. या संख्येपेक्षा महत्त्वाचं होतं ते आम्ही पाहिलेलं त्यातलं सौंदर्य!
कोणीस ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २००६ माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस. दिवस सोनेरी कसे असू शकतील, असा प्रश्‍न मला आधी पडायचा. पण मला पडलेलं हे कोडं या दहा दिवसांनी अलगद सोडवलं!

निमित्त Butterflyindia meet चं होतं. Butterflyindia हा एक yahoo group आहे. या गटाची दर वर्षी एक बैठक होते. मागच्या वर्षी ती अरुणाचलच्या सीमेवरील जयरामपूर या एका छोट्याशा गावात झाली. पूर्वोत्तर भारत बघण्याची सुवर्णसंधी त्यामुळं मला मिळाली. तिथे फिरण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ILP (Inner Line Permit); पण त्याची सोय आधीच करण्यात आली होती. फिरण्यासाठी बस, राहण्याची व्यवस्था, सगळ्या गोष्टी तयार होत्या. दहा दिवसांत पूर्ण अरुणाचल बघणं शक्‍य नव्हतं. त्यामुळे आम्ही चार दिवस जयरामपूर, तीन दिवस नामदफा आणि दोन दिवस काझिरंगा असा कार्यक्रम आखला.

गुवाहाटीला पोचल्यानंतर आम्ही रात्रभराचा बसप्रवास करून जयरामपूरला पोचलो. तिथे बॅग्ज टाकून चळरे ची बस पकडली आणि नामदफा गाठलं. दोन दिवस तिथं होतो. भारतातील निसर्गसौंदर्य आणि त्यातील विविधता याचं नामदफा हे उत्तम उदाहरण. साधारण दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात हे जंगल पसरलेलं आहे. या परिसरातील उंचीतही ८९५ ते २००० फूट अशी विविधता! त्यामुळे तिथे आढळणाऱ्या फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या जातींमध्येही तितकीच विविधता पाहायला मिळते. नामदफामध्ये आम्ही ऊशलरप या भागात राहिलो होतो. चळरे ते ऊशलरप हे दोन तासांचं अंतर पार करायला आम्ही साडेतीन तास घेतले. कुठे कुठे बघू आणि काय काय बघू अशी आम्हा सगळ्यांचीच अवस्था झाली होती.

तिथे दिसणाऱ्या फुलपाखरांचे रंगही वेगळे आणि तितकेच मोहक. Purple Saphire हे अगदी छोटे लाल पिवळ्या रंगाचे फुलपाखरू. पहिल्यांदा जेव्हा पाहिले तेव्हा फोटो मिळावा म्हणून सगळे जीव टाकत होते; पण हळूहळू कळायला लागलं, की आपल्याकडे Emmigrants (दुधी) ही फुलपाखरं जितक्‍या सहजपणे बघायला मिळतात, तितकीच ही फुलपाखरं तिकडे दिसतात. तीन तासांच्या ट्रेलमध्ये आम्ही फक्त दोन किलोमीटर चाललो आहोत. नेचर ट्रेल आणि ट्रेकिंग यात हाच तर फरक असतो. ट्रेकिंग करताना आपण चालता चालता बघतो आणि नेचर ट्रेलला आपण बघता बघता चालतो! त्या पहिल्याच दिवशी आम्ही ३२ जातींची फुलपाखरं पाहिली.

नामदफाचा निरोप घेऊन आम्ही जयरामपूरला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. तोपर्यंत बाकीचे मेंबरही पोचले होते. मग सगळ्यांशी ओळख झाली. इंटरनेटवरचा ग्रुप असल्यामुळे मी कुणालाच प्रत्यक्षात भेटले नव्हते; पण भेटल्यावर ओळख व्हायला वेळ लागला नाही. कारण आम्हा सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा आणि समान धागा होता - फुलपाखरं.

२१ तारखेला आमच्या कार्यक्रमाला खरी सुरवात झाली. चांगलांग जिल्ह्याच्या वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमच्या पहिल्या ट्रेलला सुरवात झाली. पहिल्या दिवशी जयरामपूर, दुसऱ्या दिवशी मनमाऊ, तिसऱ्या दिवशी नामपॉंग, चौथ्या दिवशी एक ट्रेक असा भरगच्च कार्यक्रम होता. या चारही दिवसांमध्ये आम्ही अगदी "विविधरंगी' अनुभव घेतले.

नुसता फुलपाखरांच्या जातींचा आकडा सांगायचा झाला, तर तो १२२ असा रुक्षपणे अंकात सांगता येईल. या संख्येपेक्षा महत्त्वाचं होतं ते आम्ही पाहिलेलं त्यातलं सौंदर्य! फ्लफी टिट, ऑरेंज ओकलिफ, कॉमन नवाब, फाईव्हबार सोर्डटेल अशी सुंदर फुलपाखरं आमच्या आजूबाजूला होती.

फ्लफी टिट हे लायसिनिडी कुळातलं एक लहान फुलपाखरू; पण याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या लांब झुपकेदार पांढऱ्या शेपट्या... या शेपट्या मिरवत हे इतकं ऐटीत उडतं जणू एखादी मुलगी आपल्या लांबलचक वेणीचा झुपका मिरवत चाललीय.

ड्रॅगनटेल हे शेड्यूल एकमधील (म्हणजे दुर्मिळ) फुलपाखरू, पण आम्ही ते सहा-सात वेळा पाहिलं. पुढचे पंख काहीसे पारदर्शक आणि सरळ लांब शेपूट असा याचा तोरा! शेड्यूल एकमधील आणखी एक फुलपाखरू म्हणजे ऑरेंज ओकलिफ. बाहेरून अगदी वाळक्‍या पानासारखं. हे फुलपाखरू आहे असं सांगूनसुद्धा लोकांना पटायला वेळ लागतो. हे आपल्या पंखांत नारिंगी-निळा असे सुंदर रंग दडवून आहे ही आणखी आश्‍चर्यचकित करणारी गोष्ट!

अरुणाचलने आपल्या कुशीत खूप काही दडवून ठेवलंय. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तिकडच्या लोकांनी आणि नवीन पिढीनं पुढं येणं आवश्‍यक आहे. याचसाठी शेवटच्या दिवशी "Breakfast with Butterflies' असा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथल्या शाळेतील मुलांना तज्ज्ञांनी फुलपाखरांविषयी माहिती दिली. अशा रीतीने २५ ला कार्यक्रमाचा शेवट झाला; पण इतक्‍या लवकर पाय निघणार कसा? त्यामुळे परत एकदा नामदफाला गेलो. या वेळी ग्रेट नवाब, स्पॅंगल अशा काही दुर्मिळ व मोठ्या आकाराच्या फुलपाखरांपासून ते पेलग्रीन ऑलेट या छोट्या फुलपाखरांपर्यंत सारं काही पाहिलं!

एका ठिकाणी "मड पडलिंग' करण्यासाठी म्हणजे चिखलातील पाण्यात विरघळलेले क्षार पिण्यासाठी आलेली २५-३० फुलपाखरं, शेजारी-शेजारी उभं राहून "मड पडलिंग' करणारी क्रूझर फुलपाखरं. स्पॅंगल फुलपाखरांचं मिलन, असे अनेक अनुभव घेतले.

जड पावलांनी नामदफाचा निरोप घेऊन आम्ही काझिरंगाला रवाना झालो. काझिरंगा हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध! या शेवटच्या दोन दिवसांमध्ये आम्ही एक दुर्मिळ दृश्‍य पाहिलं - एकशिंगी गेंड्यांचं मिलन. असे असंख्य अनुभव मनात साठवून आम्ही परतलो. कितीही दिवस गेले तरी हे अनुभव तितकेच नवीन राहतील. थॅंक्‍स अरिफ सिद्दिकी आणि विजय बर्वे.


Story

Labels:

0 Comments:

Post a Comment

<< Home